खंड ४

मी आता थोडे सांजशकुन या संग्रहाविषयी लिहिणार आहे. जर कधी काळी मी माझ्याच लेखनाविषयी जाहीरपणे लिहिलेच, तर मी या एकाच संग्रहाविषयी लिहीन. पण आता सहज थोडे, तात्पुरते लिहायचा माझा विचार आहे. या पुस्तकात आलेल्या कथांविषयी चांगले बोलणारा एकही माणूस तुम्हांला भेटणार नाही. .भि.सारख्यांना (not that it matters) तर अशा कथा लिहिणेच मुळी एक Aberration वाटते, व हा संग्रह माझ्या पुस्तकांत sport वाटतो. साधारणपणे अगदी पहिल्या संग्रहापासून माझ्या पुस्तकांना पुष्कळ आणि दीर्घ परीक्षणे मिळाली. पण या संग्रहावर मी कुणा बागूल नावाच्या पुण्याच्या एका बुवाचे छोटे परीक्षण पाहिले. त्यात त्याने मी "आनंद" हा शब्द भारतीय परंपरेपेक्षा निराळ्या अर्थाने आणि भोंगळपणे वापरला आहे असे म्हटले! भारतीय परंपरा गेली खड्ड्यात. मी येथे योगासने करण्याचा प्रयत्न करतो आहे, आणि हे चिरंजीव मी पाय कथ्थक नृत्याप्रमाणे वापरत नाही, म्हणून नाजुक आठी घालतात! आता यापुढे परीक्षणे येणारही नाहीत, कारण हे पुस्तक म्हणजे काही तरी अती Profound आहे की, एक जोक आहे याविषयी कुणाची खात्री नाही, आणि मराठी समीक्षक जर कशाला जास्त सांभाळत असेल, तर स्वतःच्या दोन पानी अगर चार कॉलमी Dignity ला!! ते जाऊ द्या. मी मात्र तो संग्रह बर्याच seriously काढला आहे हे खरे. Is it all worth it? या प्रश्नांचा मी वर उल्लेख केलाच आहे. अशा तर्हेचे moments of truth मला वाटते बहुतेकांच्या आयुष्यात येतात. काही वेळा क्षीणपणे येऊन क्षीणपणे विरून जातात. पण ते कितीही लहान आयुष्यात आलेले असले, तरी मला त्यांच्याविषयी फार कुतूहल आहे. कारण (फार मॊठ्या व्यक्तींच्या बाबतीत) तो एक पुनर्जन्म असतो, किंवा निदान ते एक महत्त्वाचे वळण तरी असते. मागे रा.बा.कुलकर्णी म्हणून एक लेखक इंग्रजी सिनेमाविषयी लिहीत. ’सत्यकथे’तील त्यांचा Ingrid Bergmann वरचा लेख सर्वोत्तम वाटतो.पण त्यांनी हल्ली अध्यात्माकडे पूर्ण वळण घेतले आहे. तसेच एके काळचे satirist , विनोदी लेखक हरि विनायक (वाडेकर). पण मला सर्वांत कुतूहल आहे ते P.Y. - पु..देशपांडेविषयी. कॉलेजमधील काळात ज्या वेळी फडके यांच्या नौबती वाजत होत्या, त्या काळात पीवाय आवडणार्यांपैकी मी एक होतो. प्रतिभा पाक्षिकातील पुरोगामी लेखनाविषयीचे त्यांचे लेख मी मुद्दाम मिळवले होते. नंतर त्यांनी एकदम लेखन बंद केले, नागपूर सोडले, व हरद्वार गाठले. या एकदम बदलामागे कोणता spiritual अगर निदान Psychological crisis होता या विषयी मी कधी तरी शोध घेणार आहे. गेल्या वर्षी मी सुट्टीत ह्रषिकेशला जाऊन दोन आठवडे राहायचे ठरवले होते. त्यावेळी हरद्वारला मी PYना भेटणार होतो, व त्यासाठी मी श्रीपुंकडून पत्ताही मिळवला होता. हरद्वारच्यावर, ह्रषिकेशच्यावर माणसाने गंगेला पाहूच नये. एखाद्या चवचाल स्त्रीच्या मोहातून मुक्त होणे सोपे ठरावे, तितके या साध्वी शुभेचे आकर्षण वाटते. नद्या मला नव्या नाहीत. पण आज नदी म्हटली की, आठवते ती गंगा, आणि मग थोडा वेळ सगळे मलीन पारोसे वाटू लागते.

तर अशाच असमाधानी वृत्तीत या कथांचे मी लेखन केले. केवळ senses मधूनच आपणाला ज्ञान होते, ही समजूत डळमळू लागली. Natural आणि supernatural (म्हणजे आपल्याला अद्याप ज्ञात न झालेले Natural) यांतील अस्पष्ट व नि:संशय सीमेवरील घटनांविषयी मला एक obsession फार पूर्वीपासून होते. परवापर्यंत माझ्याजवळ केवळ Ghost stories पुस्तकांची एक छोटी लायब्ररीच होती. Lobsand Rampa, तुमचा Castaneda नंतर आले. (या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट व निरपवादपणे मी सांगतो. मला अध्यात्मामध्ये काडीचेही Interest नाही. मला कोणत्याही Institutionalized Religion विषयी आत्मीयता नाही, आणि मी कदाचित चंबळ खोर्यातील एखादा अट्टल दरोडेखोर होऊ शकेन, पण मी कधी एखाद्या स्वामीचा, मठाचा, व्यक्तिचा शिष्य होऊ शकणार नाही. Institutionalized Religion म्हणजे सरळ conspiracy आहे. माणूस कितीही मोठा झाला, तरी तो माणूसच. मग तो तुकड्यांचा, गाडग्याचा, संभोगातून समाधीवाला, किंवा मौन पाळून ज्ञान देणारा असो. सार्या बदलत्या आयुष्यात एकच अभंगपणे टिकलेला विचार म्हणजे ही घृणा! मी येथील अरविंद मंडळ पाहिले. त्यात मध्यभागी एक फूल ठेवून त्यावर सगळ्य़ानी चिंतन करायचे असे. प्रेत नसता पोस्ट मॉर्टेम करण्य़ासाठी बसल्याप्रमाणे दिसणारी ती माणसे आठवली की, अजूनही हसू येते. तुम्हांला घरी फूल मिळत नाही की, तुम्हांला फूल असल्याखेरीज चिंतन येत नाही? या चिंतनाचे ध्येय काहीही असो, ती अशी एक एकाकी भावना आहे की, तिला कसल्याही जाहीरपणाची बाधाच व्हावी. वारकरी दिंडीत मोठी मिशाळ माणसे एकेक तंगडी वर फेकत धेनुवल्लभाप्रमाणे आपले मत जगाला दाखवत, पुढे मागे नाचू लागतात, त्या वेळी तर आपणच काही अपकृत्य करत असल्याप्रमाणे मला ओशाळे वाटते. Reformation च्या काळात Enthusiasm हा शब्द ज्या वाईट अर्थाने वापरला जात असे, तोच अर्थ आजही मला योग्य वाटतो. कोणत्याही स्वरूपातील Enthusiasm पाहिला की, पोटात ढवळते, आणि Spiritual Enthusiasm या रोगातील Diabetic coma अवस्था आहे.)

विशेषत: unconsciousच्या अंधार्या गूढ भागात जी मोडतोड, जुळवाजुळव होते, त्याबाबत Depth Psychology ला अद्याप फार थोडी माहिती आहे. मला ते सारे किमयेप्रमाणे अद्भुत वाटते. काव्यात अचानक लखलखीतपणे प्रकट होणारी एखादी ओळ अगर उपमा (जिच्यामुळे खुद्द कवीदेखील विस्मित होतात), प्रतिमा यांविषयीच केवळ मी हे म्हणत नाही. Creative Process मध्ये हे अगदी common place आहे. Sleep on it हा व्यावहारिक सल्लादेखील अनेकदा याचमुळे उपयुक्त ठरतो. काही वेळा (हा अनुभव तुम्हांलाही असेल) झोप झाल्यानंतर पूर्ण जाग येण्याआधी काही सेकंद एक विलक्षण अवस्था असते. त्या वेळी आपण नि:संशय जागे असतो, पण अद्याप पूर्णपणे दैनंदिन झालेले नसतो. हा काळ काही वेळा विलक्षण सुपीक असतो. त्या वेळी दिसणार्या एखाद्या दृश्यात काही तरी vivid, visionary, apocalyptic असते. (mystic मात्र नसावे. पण मला त्याबदल काही सांगता येणार नाही. mysticism विषयी मला पूर्ण अज्ञान आणि अरुची आहे.) पण या सार्या गुंतागुंतीत मी चकित होतो ते निराळ्याच गोष्टीमुळे. अनेक वर्षांपूर्वी संबंध आलेल्या घटना, व्यक्ती, अचानक नव्या (Transferred) रूपात अशा अचानकपणे प्रकट होतात की, क्षणभर हादरून गेल्यासारखे वाटते. वास्तविक या घटना, या व्यक्ती इतक्या पूर्णपणे विसरून गेलेल्या असतात (निदान आपण तसे समजत तरी असतो.) की जर त्या कुणी मुद्दाम आठवायचा प्रयत्न केला, तरी आठवत नाहीत. पण या क्षणी मात्र त्या अशा vividnessने प्रकट होतात की, त्याबद्दल संशयच उरत नाही. जॅकच्या आईने beans खिडकीतून बाहेर फेकल्या, व रात्रीत त्या प्रचंड वाढून बसल्या. जुन्या आठवणींचे तुकडे आपण असेच कुठे तरी फेकून देतो. पण ते अंधारात Horizontally वाढत राहतात, व अश्या एखाद्या क्षणी फणा काढून समोर उभे राहतात. भूतकाल नष्ट या अर्थाने भूत न राहून अतृप्त समंध या अर्थाने भूत म्हणून येतो. म्हणून एकदा भोगून झाले, सुटलो असेदेखील भूतकाळाविषयी आपल्याला समाधान नाहीच कां?

मला Archeology विषयी थोडे interest आहे. Schliemannने केलेले काम व शोधून काढलेला Mask of Agamemnon, Evansचे Minoan Civilisation विषयीचे खनन, युफ्रेटिस खोर्यातील Babylon, Nineva, Jericho विषयी मी पुष्कळ वाचले आहे. इतर कार्य केवढेही भव्य असले, तर सार्या खननातील अतिशय उत्कट क्षण म्हणजे एखादा अतिप्राचीन, बहुधा अज्ञात भाषेतील शिलालेख सापडणे. काही शिलालेखांची भाषा आजही अज्ञातच आहे. Ventrisने Creteमधील Linear A चे गुपित शोधून काढले, पण त्यालाही Linear B ने दाद दिली नाही. Assyriansच्या हजारो विटा अद्यापही आपली अक्षरे घेऊन मूक आहेत. परवा Hittite विषयी मी एक पुस्तक वाचत होतो. Hittite या लोकांविषयी परवापर्यंत बायबलमध्ये उल्लेखलेली एक जमात या पलीकडे माहिती नव्हती. आज त्या विषयावर एक छोटी लायब्ररी आहे. प्रथम त्यांची भाषा semitic म्हणून तिचा विचार झाला. (कारण तिची लिपी आहे cuneiform ) पण नंतर त्यांना एकदम जाणवले की, ती Indo European Language आहे. त्या जमातीतील काही राज्यकर्त्यांची नावे संस्कृत आहेत. एके काळी आर्यांचीच एक शाखा तिकडे जाऊन मूळ आदिवासींवर विजय मिळवून स्थायिक झाली. त्या संदर्भात एका संशोधकाने लिहिले, ’आयुष्यातील मला एक उत्कट आनंद केव्हा मिळाला माहीत आहे, या प्राचीन अज्ञात भाषेतील लेखावर पूर्ण हताशपणे नजर फिरवत असता अचानक एक परिचित अक्षर दिसले तेव्हा. सारा अर्थ नंतर कुणाला समजेल तर समजो. मला एक अक्षर पुरे आहे.’

अनेक वर्षांपूर्वीची अंधारातही दुर्दम्यपणे वाढत राहणार्या स्मृतींची, unconscious च्या विलक्षण किमयेने भारून, भरून गेलेली चित्रे ज्या वेळी dream vividness ने सजून प्रकट होतात, त्या वेळी ती मला या Hittite शिलालेखाप्रमाणे वाटतात, ती कोणत्यातरी अज्ञात भाषेतून आपल्याला आलेली पत्रे वाटतात. काही तर Haunting वाटतात, काहींचा अर्थ शोधण्याची धडपड असते. अर्थ पुरता सापडत नाही, पण काही पाऊलखुणा मात्र ओळखीच्या वाटतात. मी एक-दोन उदाहरणे देऊन सांगतो. (आतापर्यंत अश्या तर्हेचे विवेचन मी फक्त "प्रसाद" नावाच्या कथेबद्दल केले आहे, आणि तेदेखील "हंस" च्या हेमलता अंतरकराला लिहिलेल्या खासगी पत्रात.)

एकदा दुपारच्या siesta नंतर जागे झाल्यावर मी हे पाहिले. मनात आले वगैरे काही नाही. चक्क पाहिले, एकले. (मी प्यालो नव्हतो, आणि खाण्यातही विशेष काही oysters, caviar and champaign असलं काही नव्हते.)

प्रचंड मंदिराला असतात त्याप्रमाणे असलेल्या लांबलचक खूप पायर्या, व त्यावर मी अगदी एकटा आहे. समोर निरनिराळ्या, रेखीव, मऊ वाळूच्या टेकड्या आहेत. समोर तीन सूर्य तेजस्वी रंगाने प्रकाशत आहेत. (तीन सूर्य!) माझ्या शेजारी एक प्रचंड वडाचे झाड आहे, व लाल फळांनी ते भरलेले आहे. (वाळवंटात वडाचे झाड!) लाल फळे पडू लागताच झाड बोलल्यासारखे होते, नव्हे, ती लाल फळे टाकतच ते बोलते. त्याचा आवाज : “चांगले तीन सूर्य आहेत. ते मावळायच्या आधी तू मुक्कामाला पोहोचशील.” मधली सुसूत्रता जाते. वाळवंटात पाऊल ठेवता येईल एवढीच पाऊलवाट आहे. तिच्यावर मी थोडा चालून आलो आहे. मग माझ्या ध्यानात येते, आपल्या हातात मराठी पहिलीचे पुस्तक आहे, पण त्या पुस्तकात रंग दाखवणारे रंगीत चित्र नाही हेदेखील मला एकदम आठवते. तसले पुस्तक दिल्याबद्दल मला नरसिंहाचा राग येतो, व मी ते पुस्तक फेकतो. तेव्हा समोरील निळ्या रंगाचा सूर्य प्रकाशित हंडी तुटून खाली पडावी त्याप्रमाणे खाली पडून फुटतो, व अनेक निळ्या ठिणग्या उडून विझतात. जास्त अंधारते, पावले जास्त झपाझप उचलली जातात. काही तरी अंतरावर दोनतीन मुली. एक परिचित, उरलेल्या पाहिलेल्या. त्या काही तरी म्हणतात, पण मी नुसताच हात हलवून पुढे जातो, व समोर गुलाबी रंगाचा सूर्य फुटून जातो. (For God's sake, forget Freud here. ती परिचित मुलगी मला प्रथम दिसली, शीच आता दिसली. पण मी तिला प्रथम पाहिले ते जवळजवळ पंचेचाळीस वर्षापूर्वी. आणि ती माझ्या पेक्षा पंधरा-वीस वर्षांनी मोठी होती.) नंतर आणखी थोडा प्रवास होतो. भोवती जास्त काळवंडते, आणि समोर गोठून गेलेल्या लाटांप्रमाणे दिसणार्या Rolling moors वर एक एकाकी झोपडी दिसते. तिच्यात कुठे प्रकाश नाही, पण ती स्पष्ट दिसते. (Literary England म्हणून मी एक पुस्तक मागे पाहिले होते. Emily Bronteचे आयुष्य ज्या Haworth Parsonage मध्ये गेले, तेथून तशा तर्हेचे Brooding moore आणि त्यावरील ही उजाड झोपडी दिसे. हेच चित्र आता माझ्या समोर होते-झोपडीच्या निखळलेल्या दारासह!) मला उगाचच राग येतो, व मला वाटते, उडत गेले हे सगळे सूर्य! मी माझ्या डोळ्यांतील प्रकाशाने प्रवास संपवेन. मग उरलेला सूर्य फुटतो. टपटप फळे गळतात, वड शेजारीच उभा आहे असे जाणवते. “तुझे सूर्य तीनच होते. ते सगळे मावळले" अंधारातून आवाज येतो. वड नाहीसा होतो हेदेखील जाणवते. निखळलेले दार वाजत राहते कर्रर्र कर्रर्र खट खट.

हे मी लिहून कुठे प्रसिध्द केले नाही (व गनिमी काव्याने त्यास पत्रात घुसडून निदान एक पूर्णांक वाचक तरी मिळवला.) सारे घडायला प्रत्यक्षात बराच काळ लागला असता. ते लिहायला मला दहा मिनिटे तरी लागली असतील. पण त्या क्षणी मात्र हा अनुभव दहा सेकंदांपेक्षा जास्त टिकला नसेल. पण तेवढ्यातही त्यात विलक्षण vivid रंग, आवाज होते. एका मुलीचा चेहरा स्पष्ट नव्हता, पण एखाद्या भारद्वाजाने बाकी अंग अदृश्य ठेवून आपला लाल डोळा रोखावा त्याप्रमाणे तिच्या कानांतील कुड्य़ांत लाल खडा होता हे मला झगझगीतपणे आठवते. वडाचा आवाज फैयाजखॉंच्या रेकॉर्डमधील आवाजाप्रमाणे ढाला होता. फुटलेल्या सूर्यांच्या तुकड्यांत Stained glassची रंगीत पारदर्शकता होती, आणि झोपडीजवळ येताच खाली वाळू बर्फचुर्याप्रमाणे बधीर करणारी थंड होती. याचा अर्थ काय? कुणास ठाउक. मला एखाद दुसरा पंजा मात्र उमटलेला दिसतो. पाहिलेल्या दोन मुलींपैकी दुसरी. आज मला तिचे नाव आठवत नाही, पण तिची करुण हकिकत माहीत आहे. (ती एका कथेचा विषय आहे.) हा नरसिंह. आठवणींमधून गेल्या सारखा वाटणारा. आपल्याजवळ असलेले आणखी एक प्रत असलेले पुस्तक त्याने मला दिले. पण रंग मिसळले की कसे बदलतात, हे दाखवणार्या चित्रासाठी मला पहिलीचे पुस्तक आवडे, व तेच त्यात नव्हते. हा कानडी मुलगा, मराठी शाळा जवळ म्हणून आमच्या शाळेत आला. बोलायला तोंड उघडले की, एकदम लालभडक हिरड्या कलिंगडे फुटल्याप्रमाणे दिसायच्या. त्याचे डोके लहान लोडाप्रमाणे होते, व त्यावर आपल्या कडक वैष्णव बापाच्या भीतीने त्याने लहान पत्रावळीएवढा संजाब ठेवला होता. मी पहिलीत असता पंधरा दिवस आजारी होतो. शाळा बंद, पण पदकी मास्तर मुद्दाम घरी येऊन पाहून गेले. बरे वाटताच मी नरसिंहच्या घरी गेलो. तेव्हा आईने रडत सांगितले, “आठ दिवसांपूर्वी तो मामाकडे गेला होता. दोनचार दिवसांच्या तापानंतर तो वारला". बस्स. भेट नाही, पुढील बेत नाहीत. महिना-दोन महिन्यांची ओळख.

आणि रंगीत चित्र नसलेले पहिलीचे जुने पुस्तक, तीन सूर्य, बोलणारा वड, आणि माझ्या नोटबुकात सार्यासाठी एक पान!

दुसरे उदाहरण "सोयरे" या सांजशकुनमध्ये आलेल्या कथेचे. (आता आणखी उदाहरणे नाहीत. शपथ, हेच शेवटचे) या कथेचे मी उदाहरण देत आहे, कारण ती मला सर्वोत्कृष्ट किंवा अती अर्थपूर्ण वाटते म्हणून नव्हे, तर इतर गोष्टी तिच्यात दिसतात म्हणून. जुन्या, अदृश्य झालेल्या, पण तरी हयात असलेल्या आठवणी अंधारप्रवास करत राहतात हे खरेच. पण काही वेळा तात्कालिक कारणानेदेखिल निराळ्याच तर्हेने कूटचित्र होते. फार वर्षांपूर्वी आम्ही गोव्याला गेलो होतो. (Scooter घेऊन गोवा भटकण्याची वेडलहर फार नंतरची.) आम्ही म्हणजे मी आणि माझा एक जुना मित्र. येथे मी त्याला श्रीपाद म्हणतो. त्याला एका मुलीशी लग्न करायचे होते. माझे त्या मुलीविषयी फारसे चांगले मत नव्हते. ती अत्यंत उथळ, flighty मुलगी होती, आणि तिच्या बहुतेक आवडीनिवडी गावठी होत्या. हे मी सांगताच श्रीपाद भडकला होता, पण त्यामुळे आमच्या मैत्रीत काही खंड पडला नाही. पण नंतर व्हायचे तेच झाले. तिने दुसर्या एका आपल्यासारख्याच गावठी माणसाला पकडले, व श्रीपादला आपली अंगठी परत केली. तो अतिशय हादरुन गेला होता. त्यातून विरंगुळा म्हणून आम्ही गोव्याला आलो होतो. एका तलावाच्या पायर्यांवर आम्ही उभे होतो. (मला वाटते, मंगेशीलाच) खाली कमळे होती. कुठेच मुद्दाम जायचे नसेल, म्हणजे प्रवासात जो एक सैलपणा येतो, तोच आमच्या कार्यक्रमात होता. श्रीपाद मात्र अजून तडकल्यासारखाच होता. बोटावरील अंगठी फिरवत तो म्हणत होता, “या बोटाला बघ महारोग झाल्यासारखे वाटत आहे.” मी 'I told you so' म्हणण्याचा मोह फार निग्रहाने आवरत होतो. त्या वेळी चांदीच्या ताम्हनात कसली तरी पांढरी आणि सुरंगीची फुले - (सुरंगीच्या फुलांविषयी संशय नाही. गंधामध्ये अत्यंत sensual असा तो मदीर गंध. ज्याच्या स्पर्शाने सारे नीतिग्रंथ बलहीन व्हावे असा!) घेऊन एक अतिशय देखणी स्त्री पूजेसाठी गेली. अशी सौंदर्यवती आम्ही अद्दापही कधी पाहिली नाही. विशेष म्हणजे To admire without the slightest desire to possess हे Stevenson ज्या wisdom चे लक्षण सांगतो, त्या wisdom च्या जाणिवेनेच पहावे असे ते सौंदर्य. नंतर तेथील फुलांच्या दुकानात तिच्याविषयी आम्ही चौकशी केली. दुकानदाराने केवळ कोकणी माणूसच देऊ शकेल अशी एक शिवी हासडली. गटारात जन्मलेल्या त्या बेवारशी पोरीने तिघांचे गळे कापून पैसा केला, आणि येसवा आता देवपूजा करते, अशी माहिती मिळाली. अंगठीच्या स्पर्शाने महारोग्याप्रमाणे वाटणार्या श्रीपादला तर नवे कारण मिळाले, आणि गळा कापला गेलेले ते तिघे आपलेच सोयरे आहेत, असे तो म्हणाला. पण मी मात्र अतिशय अस्वस्थ झालो. कदाचित त्या स्त्रीच्या बाजूनेही सांगण्यासारखे काही असेल. पण त्याहीपेक्षा त्रस्त करणारी गोष्ट म्हणजे बेइमानी ही काही स्त्रीमुळे, आणि स्त्रीच्या बाबतीतच होते असे नाही. ज्या वेळी तडजोड स्वीकारली जाते त्या वेळी कुठे तरी हे बेइमान होतेच. काळजातून आपुलकीने न निर्माण झालेले लाडे लाडे शब्द; मूल्य स्वीकारणे असा बहाणा करत क्षुद्र दमडीचा स्वार्थ साधणे इत्यादी इत्यादी. प्रत्येकाच्या मनात कुठे तरी एक न्यायाधीश टेबलावर हातोडा बडवत बसलेला असतो... गुन्हेगार, बेइमान, बेशरम.... मग वाटायला लागते की, सगळेच सोयरे. विश्वासघात करणारे, करुन घेणारेही, कारण पुष्कळदा दोन्ही व्यक्ती एकच असतात.

या खळबळीत अस्वस्थ झोप आली. पुष्कळशा गोष्टी Transference मुळे बदलल्या. जांभळा रंग, पाण्यात हाडे हाडांचे झुंबर, सोललेले पक्षी... म्हणजे भूतकाळात आपण ज्यांना विसर्जित समजत होतो त्या आठवणी, अस्वस्थ करणारे एखादे तात्कालिक कारण, किंवा भविष्यकाळातील एखादी Fantasy ही सारी कुठे तरी घुसळून जाऊन विकृत (वाईट अर्थाने नव्हे), संघटीत किंवा अद्भुत होऊन प्रकट होत राहतात, आणि आज मला हे जग जास्त आकर्षक, जास्त अर्थपूर्ण वाटत आहे. इतरांचे मत "सांजशकुन" म्हणजे माझे एक अ-स्वाभाविक, आजाराच्या अवस्थेसारखे पुस्तक भले वाटो, मला माझे खरे जगणे असल्या कथांतून वाटते. एखाद्या खोल विहिरीतून दगड टाकून आवाज येण्याची वाट पाहत असल्याप्रमाणे, आवाजापेक्षा त्याची वाट पाहण्यात आनंद आहे. यात अनेक धोके आहेत, पण त्यांची मला पूर्ण कल्पना असल्यामुळे फसगत होणार नाही. कर्नल फॉसेट नावाचा एक प्रवासी ब्राझीलच्या रानात कायमचा नाहीसा झाला. त्याच्या शोधासाठी गेलेल्या Peter Flemingचे त्या अनुभवावर एक सुरेख पुस्तक आहे. त्या Fausett ला कुणी तरी जंगल्यातल्या धोक्याविषयी सांगितले, तेव्हाचे त्याचे उत्तर फार अर्थपूर्ण आहे. “Yes, I know. When I know that there are pitfalls, they do not remain pitfalls. They only become my choice to have permanent rest in.” मी असले पुष्कळसे प्रसंग नोंदून ठेवले आहेत. त्यांतील काहींचा रंग उडाला आहे. काही त्यातील undecorated, क्रूर सत्याच्या दर्शनामुळे फार तापदायक आहेत, व ते तसेच नोटबुकात राहतील. सर्वात महत्वाचा धोका म्हणजे मला ज्या ठिकाणी अर्थपूर्णता दिसेल, तेथे इतरांना केवळ गोंधळ दिसेल. (“यात्रिक सारखी सोपी कथा काही जणांच्या डोक्यावरून गेली! पण ज्यांना Judas किंवा Quixote मुळी माहीत नाही, त्यांच्याबाबतीत दुसरे काय होणार? Judas कोण? हा प्रश्न मला येथील प्राध्यापकानेच विचारला होता.) म्हणजे या कथांतील सत्ये शेवटी subjectiveच राहण्याची भीती आहे. सारी कलाच मुळात subjective असते. ते तर तिचे मायामूळ असते. ते तसेच ठेऊन, तेथून अन्न घेऊन मग त्याला universal सत्याचा अवतार देणे हे अती थोर कलावंताचे सामर्थ्य आहे. पण या देवाणघेवाणीत (सगळ्याच तडजोडीत ज्याप्रमाणे पातिव्रत्याचा कल्पनेला मुरड घालावी लागते, त्याप्रमाणे) एक गोष्ट अटळ होते. हे सत्य जेवढे जास्त universal करत जावे, म्हणजेच जास्त लोकांना समजेल असे मांडावे, तसे ते जास्त सोपाळू होत जाते, आणि जे मुळातच complex आहे, त्याला सोपे करुन देणे म्हणजे त्याची हत्या करण्यासारखे आहे. यातच "या (किंवा इतर) कथा लोकांना समजतील अशा स्वरुपात कां लिहू नयेत" या प्रश्नाचे उत्तर आले. मी काही दिवसांपूर्वी Isak Dinesan या लेखिकेची काही पुस्तके आहेत का, म्हणून तुम्हांला विचारले होते. ही बाई तशी थोडी मुलखावेगळीच म्हणायची. तिने एका South African शेतकर्याशी लग्न केले, कारण काय, तर तिचे त्याच्या भावावर प्रेम होते, ते यशस्वी झाले नाही म्हणून - “And this brother was so completely different from him, that I had to marry him.” म्हणजे या ठिकाणी Hamletच्या "हे चित्र पहा आणि हे चित्र". या स्वगताची पूर्ण विल्हेवाटच लागली! इतर काही जणांबरोबरचा तिचा एक फोटो मी पाहिला, तर कॉनन डॉइलच्या spirit photography मध्ये एक व्यक्ती केवळ धुराची असल्याप्रमाणे दिसते, तशी ती दिसते. ती फक्त oysters आणि champagne या वर राहत असे, आणि ती वारली त्यावेळी she starved herself to death असे डॉक्टरांचे मत पडले. म्हणजे एवढे खर्चिक आणि श्रीमंती खाणे खाऊन उपाशीपणाने मरणारी हीच पहिली व्यक्ती असेल. तिच्या दोन पुस्तकांवर परवा TLS मध्ये (Times Literary Supplement) परिक्षण आले, त्यात जे वाक्य आहे त्यात मी उल्लेखलेला धोका स्पष्ट मांडला आहे. “A typical tale by Isak Dinesan is a complex, very personal statement. The lovingly articulated skeleton of a purely private truth.”

असेलही. पण तिच्यासारख्या दोन चार कथा लिहीता आल्या तर त्या Private Truth च्या आड जायला माझ्या इतका उत्सुक माणूस मिळणार नाही.

आणखी एक दोष त्या परिक्षणात दाखवला गेला आहे. “But it would be virtually impossible to discuss Dinesan without painstaking synopsis. If you subtract the meaning, almost nothing remains. Yet it is the story that must persuade you that the meaning matters.” हे थोडेसे खरे आहे. Storyच्या बाबतीत ती काही प्रसंगी फार thin वाटते. पण उलट, situation किंवा incident भक्कम दाखवून काही सूचित केले की, मग contrived गडद रंग इत्यादी टीका होते!

आता या सार्यांतील काही धागे एकत्र आणू. आतापर्यंत मला पाहिजे तसे, तेवढेच मी लिहीले. इतकेच नाही, तर त्या अत्यंत लहान कोपर्यातच मी स्वच्छपणे "मीपण" भोगत जगलो. आता मिंधेपणा स्वीकारुन पिंड बदलता येईल का, महत्वाचा प्रश्न आहे. दुसरे, जरी मी लिहीत राहीलो (त्यातही आता नवथर उत्साह नाही - म्हणजे त्या प्रकाशित करण्यात.) तरी त्या लेखांचे स्वरूप इतके वैयक्तिक राहील की, पुस्तकांच्या दृष्टीने त्यानां भवितव्य राहणार नाहीच यात आश्चर्य नाही, तर नियतकालिकातदेखील ते प्रसिध्द होणे अशक्य होईल. असला Dandyism लोकांना आवडत नाहीच. म्हणजे तुम्ही तुमच्या पत्रात वापरलेल्या Gold mine या शब्दप्रयोगामुळे मी कां हादरून गेलो हे तुमच्या ध्यानात येइल. एका दृष्टीने त्यामुळे आपण न कळत आपणाला न पेलण्याजोगे काही स्वीकारत आहो की काय, याबद्दल विचार करायला संधी मिळाली. अतिशय Tentatively मला असे वाटते. शक्य झाल्यास Translation Work कदाचित आपल्याला जमेल. USIS ची पूर्वीची भाषांतराची scheme आज असती, तर प्रश्न बराच सुलभ झाला असता. पण आमच्या सार्वजनिक नीतिमत्तेच्या कल्पनेमुळे ती योजनाच गेली. म्हणजे येथे पैसा मिळत नाही, बाहेरून येणारा पैसा पवित्र वाटला नाही. माझा इंग्रजी भाषेशी बर्यापैकी परिचय आहे. तिच्यातून मराठीत भाषांतरही जमेल. म्हणजे मजूरी वाया गेली असा ताप होणार नाही, असे काम होऊ शकेल. अर्थात, अशा भाषांतरित पुस्तकांना व्यावसायिक किती क्षेत्र आहे या बद्दल मी साशंक आहे. कदाचित मी अनंतरावांशी (Continentalच्या) देखील चर्चा करीन. पत्रात मी बराच high stand घेतला, असे तुम्हांला वाटते का? मग एक गैरसमजूत मनातून काढून टाका. A Shining Sword of Virtue असा माझा Portrait मला काढायचा नव्हता. तो पूर्णपणे खोटा होईल. हजार ठिकाणी मी मनाविरूद्धच्या गोष्टी सहन केल्या, तडजोडी स्वीकारल्या व त्यानंतरही एक अर्थहीन जाहीर स्मित चेहर्यावर ठेवले. फक्त लेखनासारख्या अत्यंत लहान बाबतीत मात्र काही गोष्टी टाळण्याचा मी प्रयत्न केला, एवढेच मला म्हणायचे आहे.

पत्र लिहून झाल्यावरच काही लिहायचे राहिले ते ध्यानात येते. त्या सार्या ता..चे हे एक Holdall पान!

(a) सांजशकुन मध्ये माणसे आहेत, पण क्वचितच त्यांना नावे आहेत. ही गोष्ट योगायोगाने घडलेली नाही. आता शाक्त यंत्रातील अक्षराप्रमाणे त्यांना किंचित का होईना, मंत्रजीवन यायला हवे. पण ते आपल्या इच्छेवर वा प्रयत्नावर अवलंबून नसते. जन्मतःच तो कविस्पर्श घेऊन जन्माला यावे लागते. हा स्पर्श Graceला आहे. काही ठिकाणी आरती प्रभूला होता.

(b) “अहम" नावाच्या कथेत काही जणांना positive approach दिसून माझ्या "तत्वज्ञानात" बदल होत चालला आहे, असे काहींना वाटू लागले आहे व माझ्याविषयी थोडी आशा वाटू लागली आहे. यात काही अर्थ नाही, कारण तो एक खुळचटपणा आहे. ती कथा एका शालेय विचाराची Fantasy आहे. तुम्ही जोग फॉल्सला गेला असालच. आता त्या धबधब्याजवळ पूल झाला आहे. फार मागे नदीतून पलीकडे जावे लागे. मध्ये दगड ठेवले होते, व त्यावर उड्या मारत पलीकडे जाताना गंमत वाटे. शरावती काही मिजासखोर नदी नव्हे. काही ठिकाणी पाण्यात जेमतेम घोटा बुडे. आम्ही एकदा पात्राच्या काठाने थोडे वर गेलो. एके ठिकाणी ते इतके अरुंद होते की, दोन मोर दोन काठांवर आले, तर माना एकमेकांच्या गळ्यात घालू शकतील, असे त्या ठिकाणचे वर्णन केले जात असे. (आता एका बाजूचा काठ कातरून पात्र रूंद केले आहे.) त्यावेळी आमची एक कल्पना की, या ठिकाणी पात्र बंद केले की, जगप्रसिद्ध जोग धबधबा खलास! ती कल्पना पंचवीस-तीस वर्षानंतर शब्दांत अडकवली इतकेच.